Indrayani River Bridge video: पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवर कुंडमळ्यात पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली असून यात अनेक पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सदर दुर्घटना घडली असल्याचे समोर आले आहे. एनडीआरएफ, पोलीस यांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे. सुमारे ३० ते ४० जण नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची भीती वर्तविण्यात येत आहे. रविवारी रात्री उशीरा चार जणांचा मृतदेह आढळून आला. वाहून गेलेल्या नागरिक आणि पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगितले जात आहे. कुंडमळ्याजवळ इंद्रायणी नदीवरील पुलावर पर्यटकांनी दुचाकी नेल्यानं ओव्हारवेट होऊन पूल कोसळला असल्याचे कारण समोर आलं आहे. मात्र ज्यावेळी इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला त्याक्षणाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल.

कुंडमळा येथील पूल कोसळल्यानंतर ३० ते ४० पर्यटक वाहून गेले असावेत अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. या दाव्याची पुष्टी करणारा व्हिडिओ समोर आला आहे. नव्यानं समोर आलेल्या व्हिडिओत चार ते पाच पर्यटक वाहून जात असल्याचं पाहायला मिळतंय. यावेळी पाण्याच्या प्रवाहाच्या बाजूला पर्यटक मोठ्या संख्येनं असल्याचं पाहायला मिळतं आहेत. तर कडेला अडकलेले लोक आपला जीव वाचवण्यासाठी धडपडताना दिसत आहेत, मात्र पाण्याचा प्रवाह इतका आहे की त्यांना वर येणं कठीण झालंय. पर्यटकांनी पडलेल्या पुलाच्य लोखंडाला घट्ट पकडून ठेवल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

👇👇👇👇

पाहा व्हिडीओ

सेल्फीच्या नादात जीव धोक्यात घालू नका

पुलावर एकाचवेळी अनेक पर्यटक फोटो काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करून जमले होते, असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले. पर्यटकांनीही आपल्या जीवाची काळजी घेणे गरजेचे आहे. सेल्फीसाठी पर्यटकांनी आपला जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत

राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी कुंडमळा येथील दुर्घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृत्यू पावलेल्या कुटुंबियांना सरकारकडून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जखमींच्या उपचारांचा खर्च शासनातर्फे केला जाईल, असेही ते म्हणाले.