अकरावी प्रवेशासाठी बुधवारपासून (ता. २१) ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरवात होणार आहे. २८ मेपर्यंत अर्ज मुदत असून ३० मे रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ३ जून रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहेत. ११ ऑगस्टपासून महाविद्यालये सुरू होणार आहेत.
इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी बुधवारपासून (ता. २१) ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरवात होणार आहे. २८ मेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असून ३० मे रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ३ जून रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार असून ११ ऑगस्टपासून महाविद्यालये सुरू होणार आहेत.
राज्यात अकरावीच्या २० लाख ९१ हजार ३९० प्रवेशाच्या जागा आहेत. त्यात कला शाखेच्या सहा लाख ७२ हजार ७५४, वाणिज्य शाखेच्या पाच लाख ४८ हजार ३१६ आणि विज्ञान शाखेच्या आठ लाख ७० हजार ३२८ एवढ्या जागा आहेत. त्यात सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ४०० महाविद्यालयांमध्ये ७८ हजार ७८० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांना अर्ज भरताना काही अडचण आल्यास ८५३०९५५५६४ हा हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे. प्रत्येक प्रवेश फेरीत ज्या विद्यार्थ्यांना पसंतीक्रमानुसार प्रवेश मिळाला नाही, त्यांना पुन्हा पसंतीक्रम बदलावा लागणार आहे. विद्यार्थ्यांना अवघ्या १०० रुपयांत प्रवेश मिळणार असून कनिष्ठ महाविद्यालयांना जात प्रवर्गनिहाय त्यांच्या टक्केवारीच्या प्रमाणात प्रवेश द्यावे लागणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील शाखानिहाय प्रवेश
- शाखा प्रवेश क्षमता
- कला ३१,६८०
- वाणिज्य १३,६२०
- विज्ञान ३३,४८०
- एकूण ७८,७८०
क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश देता येणार नाहीत
खासगी अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये खासगी स्वयंअर्थसहाय्यिता तुकडी काढून त्याठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश देण्याची पद्धत सुरू होती. त्याठिकाणी विद्यार्थ्यांकडून मनमानी पद्धतीने शुल्क घेतले जात होते. या ऑफलाइन प्रवेश प्रक्रियेवर शिक्षणाधिकाऱ्यांचे सुद्धा नियंत्रण शक्य नव्हते. त्यामुळे यंदा पहिल्यांदाच राज्य स्तरावरून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय झाला. त्यामुळे आता सर्वच कनिष्ठ महाविद्यालयांना क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश देताच येणार नाहीत, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी सांगितले.
‘या’ लिंकवर विद्यार्थ्यांना करावा अर्ज
विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी https://mahafyjcadmissions.in/landing या अधिकृत लिंकवर अर्ज करता येणार आहे. त्याठिकाणी बहुतेक माहिती इंग्रजीत असून प्रत्येक प्रवेश फेरीच्या तारखा, प्रवेशासंदर्भातील माहितीपुस्तिका, प्रवेशाचे नियम, शाखानिहाय प्रवेश क्षमता, अशी माहिती देण्यात आली आहे. तसेच कॅप राउंड व खासगी कोट्यातील प्रवेश क्षमता देखील ऑनलाइन पाहायला मिळेल. पसंतीक्रमानुसार विद्यार्थ्यास प्रत्येक प्रवेश फेरीवेळी कोणत्या शाखेच्या किती जागांवर प्रवेश झाले आणि किती प्रवेश शिल्लक आहेत हे समजणार आहे. प्रवेश अर्ज दोन भागात भरावा लागणार असून पहिल्या भागात वैयक्तिक माहिती आणि दुसऱ्या भागात महाविद्यालयांचे पसंतीक्रम टाकावे लागणार आहेत. एका विद्यार्थ्यास १० महाविद्यालयांची निवड करता येईल.