Monsoon Update : यंदा मोसमी पाऊस नेहमीच्या वेळेआधी म्हणजेच जूनच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईत दाखल होण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे. नैऋत्य मोसमी पाऊस बंगालच्या उपसागरातून प्रवास करत १ जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होतो.
त्यानंतर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून पुढे सरकत तो ५ जूनपर्यंत कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र व ईशान्येकडील राज्यांत दाखल होतो.
साधारण १० जूनला महाराष्ट्र, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, बिहार या राज्यात पोहोचतो. केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल झाल्यानंतर त्यानंतर साधारण सहा ते आठ दिवसांनी मोसमी पाऊस महाराष्ट्रात दाखल होतो.
दरम्यान, हवामान अभ्यासकांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, यंदा मोसमी पाऊस मुंबईत जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होण्याची शक्यता अधिक आहे.
सामान्यतः मुंबईत पावसाळा १० जूननंतर सुरू होतो, परंतु यंदा ८ ते ११ जून दरम्यान पावसाळा सुरू होण्याची ९२ टक्के शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे मुंबईत यंदा जूनच्या मध्यापर्यंत पावसाची वाट पहायला लागणार नाही.
गेल्या वर्षीही लवकरच !
गेल्या वर्षी मोसमी पाऊस मुंबईत ९ जून रोजी दाखल झाला होता. म्हणजेच नेहमीच्या वेळेपेक्षा एक दोन दिवस आधी. २०२३ मध्ये उशिरा म्हणजेच २५ जून रोजी मोसमी पाऊस दाखल झाला होता. २०२२ मध्ये ११ जून, २०२१- ९ जून, तर २०२० मध्ये १४ जून रोजी मोसमी पाऊस दाखल झाला होता.