आनंदाची बातमी: मान्सून केरळात दाखल,

 

Monsoon in Kerla: राज्यात गेल्या आठवड्यापासून पूर्वमान्सूनने जोरदार हजेरी लावल्यानंतर आता मान्सूनने केरळमध्ये आठ दिवस आधीच सरप्राईज एन्ट्री घेतली आहे. मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला असल्याची घोषणा भारतीय हवामान खात्याने (IMD) केली आहे. यापूर्वी 2009 मध्ये मान्सून केरळात 23 मे रोजी दाखल झाला होता. त्यानंतर 15 वर्षांनी मान्सून इतक्या लवकर केरळात दाखल झाला आहे. आता पुढील चार ते पाच दिवसांत कोकणात दाखल होण्याची शक्यता असून कोकणात सध्या जोरदार मान्सूनपूर्व पाऊस सुरु असून. मुंबईत 1 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केरळ हे मान्सूनचे भारतातील प्रवेशद्वार मानले जाते. केरळात प्रवेश केल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून देशभरात आगेकूच करतो. (Monsoon)

गेल्या काही दिवसांपासून तळकोकणात जोरदार मान्सूनपूर्व पाऊस सुरु आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला वळीवाच्या पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. या मान्सूनपूर्व पावसामुळे आणि वादळी वाऱ्यांमुळे सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता.

हवामान खात्याकडून अधिकृत घोषणा

नैऋत्य मोसमी पाऊस आज (24 मे) केरळमध्ये दाखल झाला आहे. दरवर्षी  1 जूनच्या तारखेला केरळमध्ये दाखल होणारा पाऊस यंदा आठवडाभर आधीच दाखल झाला असल्याचं भारतीय हवामान विभागानं सांगितलं. 2009 नंतर भारताच्या भूमीवर हंगामी पावसाची ही पहिलीच सुरुवात असल्याचं IMD नं म्हटलं. मान्सून लवकर दाखल झाल्याने सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक चित्र आहे.

पूर्व-मध्य अरबी समुद्र व त्याला लागून असलेल्या ईशान्य अरबी समुद्रात तसेच कोकण-गोवा आणि दक्षिण गुजरातच्या किनारपट्टीजवळ व किनारपट्टीवर 24 ते 25 मे दरम्यान ताशी 45-55 किमी  ते ताशी 65 किमी वेगाने झंझावाती वारे वाहण्याची शक्यता आहे.

केरळनंतर पुढील काही दिवसांमध्ये मान्सूनचा प्रवेश दक्षिण आणि मध्य भारतात होणार आहे. दरम्यान दक्षिण कोकण आणि गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून या भागांत प्रचंड पाऊस सुरु आहे.येत्या 36 तासांत राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील चार ते पाच दिवसांत कोकणात दाखल होण्याची शक्यता असून  मुंबईत 1 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

2009 नंतर पहिल्यांदाच मान्सूनचे लवकर आगमन

केरळ हे मान्सूनचे भारतातील प्रवेशद्वार मानले जाते. केरळात प्रवेश केल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून देशभरात आगेकूच करतो. 2009 नंतरचे सर्वात लवकर आगमन ठरले असून 2009 साली मान्सून 23 मे रोजी केरळात दाखल झाला होता. यावर्षी त्याहीपेक्षा एक दिवस आधी म्हणजेच 24 मे रोजी मान्सूनचे आगमन झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. 1975 नंतरच्या नोंदी पाहता, केरळमध्ये मान्सूनचे आतापर्यंतचे सर्वात लवकर आगमन 1990 साली झाले होते. तेंव्हा मान्सून 19 मे रोजी केरळात दाखल झाला होता. ही तारीख नेहमीच्या मान्सून आगमनाच्या तारखेच्या 13 दिवस आधीची होती.

मान्सून केरळात दाखल झाल्यामुळे आता देशाच्या इतर भागांतही त्याचा विस्तार हळूहळू होणार असून शेतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या नैऋत्य माेसमी पावसाचा शेतकऱ्यांना लाभ होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट,  मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून किनारपट्टी भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 73 मी.मी. पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस कणकवली येथे 130 मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर वेंगुर्ला 111  मी.मी. आणि देवगड 102 मी.मी. पाऊस झाला आहे. सध्या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे. तर समुद्रात चक्रकार स्थिती निर्माण झाल्याने वादळ सदृश्य स्थिती निर्माण होऊन समुद्र खवळलेल्या स्थितीत आहे. त्यामुळे 3 नंबरचा बावटा लावण्यात आला असून मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

 

Leave a Comment