manoj-jaranage-patil विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचं काउंटडाऊन सुरू झालं आहे. येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे, त्यापूर्वी मोठी बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील येवल्याला जाणार आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या मतदानसाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या वीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर तेवीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. प्रचाराचं काउंटडाउन सुरू असतानाच मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे मनोज जरांगे पाटील हे येवल्याला जाणार आहेत. येवल्यामध्ये यावेळी विधानसभा निवडणुकीत हायहोल्टेज मुकाबला पाहायला मिळू शकतो. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून येवला विधानसभा मतदारसंघात छगन भुजबळ हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर शरद पवार गटाकडून माणिकराव शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
manoj-jaranage-patil
मनोज जरांगे पाटील हे अजूनही मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं या आपल्या मागणीवर ठाम आहेत. मात्र दुसरीकडे छगन भुजबळ यांनी मात्र ओबीसीचं नेतृत्व करताना मनोज जरांगे पाटील यांच्या या मागणीला मोठा विरोध केला आहे. याच मुद्द्यावरून आता येवल्याची निवडणूक चर्चेत आहे. या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील हे येवल्याला जाणार आहेत. मात्र हा आपला राजकीय दौरा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. ‘येवला दौरा हा राजकीय नसून, त्या ठिकाणी आमच्या एका सहकाऱ्याची आजी वारली आहे, त्यामुळे सांत्वनपर भेट आहे. ही राजकीय भेट नसून सामाजिक आणि दुःखाची भेट आहे,’ असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं की, देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा खरं बोलले, मराठा समाज कट्टर हिंदुत्ववादी आहे. मराठा समाज महायुतीच्या बाजूने आहे. मराठ्यांविषयी त्यांनी पहिल्यांदा चांगली आणि खरी गोष्ट बोलली. परंतु हिंदुत्ववादी हिंदुत्ववादी म्हणून आमचे लोक मरायला लागले आहेत. मराठा आरक्षणामुळे आमचे हाल सुरू आहेत. आरक्षणापासून रोखायला नको होतं. तुम्हाला वाटतं महायुतीसाठी मराठ्यांनी काम केलं तर त्यांना आरक्षण देण्याची जबाबदारी तुमची होती. जसे आम्ही तुमच्यासाठी कट्टर होतोच तसे तुम्ही आमच्यासाठी कट्टर नाही, आम्हाला माहिती आहे महाविकास आघाडी फसवत आहे, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.