Maharashtra Weather Update
तापमानाचा पारा वाढतच चालला आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. नागरिकांच्या अंगाची अक्षरश: लाही लाही होत आहे. राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील तापमान हे सर्वात जास्त आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यातील नागरिकांना दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं देखील मुश्किल झाले आहे. राज्यात चंद्रपूरने सर्वात जास्त म्हणजे ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली आहे. आज देखील हवामान खात्याने विदर्भ आणि मराठवाड्याला उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णता आणखी वाढणार आहे. आज विदर्भातील नागपूर आणि अकोला येथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या तीन जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे. या तिन्ही जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ वातावरण आणि उष्ण हवामानाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
रविवारी देशातील सर्वांत उष्ण १० शहरांमध्ये महाराष्ट्रातील विशेषतः विदर्भातील सहा शहरांचा समावेश आहे. विदर्भातील नागपूर येथे देशातील उच्चांकी ४४.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अकोला, अमरावती, चंद्रपूर, वर्धा आणि ब्रह्मपुरी या शहरांमध्ये देखील सर्वात जास्त तापमान होते. विदर्भातील नागरिक वाढत्या उष्णतेमुळे हैराण झाले आहेत. अशामध्ये हवामान खात्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.
दरम्यान, विदर्भात प्रचंड उन्हामुळे अंगाची लाही लाही होण्याची वेळ आली असून विदर्भातील नागरिक होरपळून निघत आहेत. रविवारी संपूर्ण राज्यात चंद्रपूर येथे सर्वाधिक म्हणजे कमाल ४४.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. तर नागपुरमध्ये ४४ अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले आहे.
अमरावती आणि ब्रह्मपुरीत उच्चांकी ४४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भातील सहा शहरात तापमान ४४ अंशावर पोहोचले आहे. अकोला ४४.३,अमरावती ४४.४, चंद्रपूर ४४.६, नागपूर ४४.०, वर्धा ४४ अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील ३ ते ४ दिवस विदर्भातील अनेक शहरांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.