Ladki Bahin Yojana April 2025 Installment Update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना मिळणाऱ्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा राज्यातील लाखो महिलांना आहे.
या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. ही योजना जुलै 2024 पासून कार्यान्वित झाली असून आतापर्यंत 9 हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. मात्र, एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार या प्रतिक्षेत आता लाडक्या बहिणी आहेत. यासंदर्भात महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
एप्रिल हप्ता कधी मिळणार?
माध्यमांशी बोलताना आदिती तटकरे यांनी “एप्रिल महिना संपण्यापूर्वी पात्र महिलांच्या बँक खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा केला जाईल,” असे सांगितले. परंतु त्यांनी कोणतीही निश्चित तारीख सांगितली नाही. साधारणपणे महिन्याच्या 25 तारखेनंतर हप्ता जारी केला जातो. यावेळी 30 एप्रिल 2025 रोजी अक्षय तृतीया आहे. त्यामुळे या तारखेला हप्ता वितरित होण्याची शक्यता आहे. एप्रिल महिना संपण्यास फक्त 9 दिवस शिल्लक असल्याने पात्र महिलांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
2 कोटी 47 लाख महिलांना लाभ
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या मागास महिलांना सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आणि ते महाराष्ट्राची कायमस्वरूपी रहिवासी आहेत, अशा कुटुंबातील 2 महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो. परंतु इतर सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जात नाही. सध्या राज्यात 2 कोटी 47 लाख महिला या योजनेसाठी पात्र आहेत. जुलै 2024 पासून आतापर्यंत 9 हप्ते वितरित झाले आहेत.
निकष बदलणार का? तटकरे म्हणाल्या…
योजनेच्या पात्रता निकष आणि अर्ज छाननीबाबत विचारले असता आदिती तटकरे म्हणाल्या, “योजनेच्या सुरुवातीपासून अनेक गैरसमज पसरवले गेले आहेत. उत्पन्न मर्यादा 2.5 लाख रुपये हा शासननिर्णयातील मूळ निकष आहे, यात काहीही बदल नाही. इतर सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी नियम स्पष्ट आहेत. उदाहरणार्थ, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी या योजनेसाठी पात्र नाहीत, तर नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना दोन्ही योजनांचा समन्वयाने लाभ मिळेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
लाभार्थी महिलांमध्ये उत्सुकता
एप्रिलचा हप्ता अद्याप जमा न झाल्याने अनेक महिला बँकांमध्ये खात्याची तपासणी करत आहेत. या योजनेच्या माध्यमातून 2 कोटी 47 लाख पात्र महिलांना आर्थिक आधार मिळत आहे. मात्र एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या विलंबामुळे काहींमध्ये नाराजी आहे. या दरम्यान आदिती तटकरे यांच्या आश्वासनानंतर आता सर्वांचे लक्ष 30 एप्रिल किंवा त्यापूर्वीच्या हप्ता वितरणाकडे लागले आहे.