Air India Plane Crash Lone survivor Viswashkumar Ramesh: अहमदाबाद येथे १२ जून रोजी घडलेला एअर इंडिया विमानाचा अपघात हा कुणीही विसरू शकणार नाही. या दुर्घटनेमुळं जगभरातील विमान कंपन्या आणि हवाई प्रवास क्षेत्राला सुरक्षेबाबत पुन्हा एकदा विचार करण्यास भाग पाडलं आहे. अहमदाबाद ते लंडन असा प्रवास करणारं विमान अहमदाबादच्या मेघानी नगर भागातील बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळलं. त्यावेळी या अपघातामधून विश्वासकुमार रमेश हे एकमेव प्रवाशी जिवंत वाचू शकले. त्यांचा चालत जातानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात एक व्यक्ती त्यांचा हात पकडून त्यांना रुग्णवाहिकेत बसवताना दिसत आहे. या प्रत्यक्षदर्शींनं त्यादिवशीचा घटनाक्रम विशद केला आहे.
गुरुवारी दुपारी एअर इंडियाचं विमान कोसळलण्याआधी बीजे मेडीकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये जेवणाची वेळ झाली होती. जेवण आटोपून डॉक्टर पुन्हा कामावर रुजू झाले. इथेच १२ खाटांचे शासकीय रुग्णालय आहे. रुग्णालयाला रुग्णवाहिकेची सेवा देणारे सतींदर सिंग संधूही जेवण आटोपून बाहेर आले, तेव्हा विमानाचा अपघात झाल्याचे त्यांनी पाहिले. ज्याठिकाणी स्फोट झाला, तिथे त्यांनी धाव घेतली असता एक व्यक्ती इमारतीच्या गेटमधून बाहेर येताना दिसला.
संधू यांना आश्चर्याचा धक्का बसला. मागे आगीचा प्रचंड लोळ दिसत असताना विश्वासकुमार रमेश त्याच इमारतीच्या गेटमधून बाहेर पडत होते. ते विमानातील प्रवाशांपैकीच एक आहेत, याची संधू यांना बिलकूल कल्पना नव्हती. योगायोगाने संधू ज्या कंपनीच्या रुग्णवाहिका चालवतात, त्या जवळपासच होत्या. संधू यांनी विश्वासकुमार यांच्या हाताला धरून त्यांना आगीपासून दूर नेले आणि रुग्णवाहिकेत बसवले.
४४ वर्षीय सतींदर सिंग संधू हे जीव्हीके-इएमआरआय या कंपनीसाठी एक दशकाहून अधिक काळ सेवा देत आहेत. कंपनीच्या १२० रुग्णवाहिकेपैकी त्यांच्या देखरेखीखाली २० रुग्णवाहिका अहमदाबाद शहरात सेवा देतात.
विश्वासकुमार पुन्हा स्फोटाच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत होते
“आम्ही सर्वात आधी इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला जखमी अवस्थेत पाहिलं आणि त्याला तात्काळ उपचारांसाठी पाठवून दिलं. त्यानंतर जळत्या इमारतीमधून आम्ही एका माणसाला बाहेर पडताना पाहिलं. मी त्यांच्याजवळ गेलो, तर ते पुन्हा मागे वळून स्फोटाच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू लागले. ते सांगत होते की, त्यांचे नातेवाईक आत आहेत”, अशी माहिती संधू यांनी दिली.
संधू पुढे म्हणाले, “आम्हाला आधी वाटलं की, त्यांचे नातेवाईक हॉस्टेलच्या इमारतीमध्ये आहेत. त्यावेळी तेच प्रवासी आहेत, हे आम्हाला माहीत नव्हतं. आम्ही त्यांना कसंतरी त्यांची समजूत घालून घटनास्थळावरून दूर नेलं आणि एका रुग्णवाहिकेत बसवून त्यांना रुग्णालयात पाठवून दिलं. त्यांच्या हाताला आणि चेहऱ्यावर जखमा झाल्या होत्या. तसेच शरीरावर भाजल्याच्या खुणा होत्या. पण ते चालू शकत होते.”
कोण आहेत विश्वासकुमार रमेश?
३९ वर्षीय विश्वास रमेश हे भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक आहेत. ते आपल्या भावासह दीव येथे आले होते. अहमदाबादहून ते आपल्या भावासोबत परत निघाले होते. एअर इंडियाच्या AI 171 या विमानात 11A या सीटवर ते बसले होते. त्यांचा भाऊ मात्र अपघातात वाचू शकला नाही. गेल्या २० वर्षांपासून रमेश हे लंडनमध्ये त्यांच्या कुटुंबासमवेत राहत आहेत