Ladki Bahin Scheme : महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. कोट्यवधी महिला या योजनेच्या माध्यमातून शासनाशी थेट जोडल्या गेल्या. योजनेच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनल्या असून काही महिलांनी लहान-सहान उद्योगही सुरू केले आहेत.
आता, मुंबई भागात राहणाऱ्या व लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना चक्क शून्य टक्के दराने 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होणार आहे.
लाडक्या बहिणींना मुंबई बँकच्या वतीने मदतीचा हात दिला जाणार आहे. लाडक्या बहिणींना आता शून्य टक्के व्याज दराने कर्जपुरवठा केला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
मुंबई बॅंकेचे अध्यक्ष काय म्हणाले?
लाडक्या बहिणींचे पैसे उद्योग-व्यवसायांच्या माध्यमातून बाजारात आले पाहिजे, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती. त्यामुळे, आता लाडक्या बहिणींना 9 टक्के व्याजदराने देण्यात येणारा कर्जपुरवठा चक्क शून्य टक्के व्याजदराने मिळणार आहे, असे मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
शासनाच्या 4 महामडंळातील योजनांमधून दिली जाणार सवलत
राज्य सरकारच्या 4 महामंडळाच्या योजना अशा आहेत की, 12 टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा लाभार्थींना दिला जातो. पर्यटन महामंडळाची आई योजना आहे. ज्या योजनेतून महिलेला 12 टक्क्यांपर्यंत व्याजाचा परतावा दिला जातो.
यासह, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, भटक्या विमुक्तांसाठीचं महामंडळ आणि ओबीसी महामंडळांच्या योजनांमधून व्याजाचा परतावा महिलांना दिला जातो.
त्यामुळे, आम्ही ज्या महिलांना कर्जपुरवठा करत आहोत, त्या लाभार्थी महिला या योजनेत बसत असतील, तर या महिलांना शून्य टक्के व्याजदरात कर्ज उपलब्ध होऊ शकतं, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
मुंबई बँकेकडून महिलांना लाख रुपयांचे कर्ज!
एका महिलेला 1 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं, त्यात 5 ते 10 महिला एकत्र येऊन व्यवसाय करू शकतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत चारही महामंडळाचे संचालक व संबंधित खात्याचे सचिव आणि अतिरिक्त सचिव होते, ज्यांसमवेत झालेल्या बैठकीतून या चारही महामंडळाच्या माध्यमातून महिलांना शून्य टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करण्याचा शासन निर्णय झाला आहे, अशी माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली.