Maharashtra Rain : शेतात काम करताना गेला जीव, वीज कोसळून महाराष्ट्रात तिघांचा मृत्यू

महाराष्ट्रात मान्सूनने एन्ट्री घेतली असून पहिल्याच पावसात सर्वसामान्यांची धांदल उडाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. लातूरमध्ये काल 27 मेला धो धो पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे.

दरम्यान भंडारा आणि वर्धा जिल्ह्यात वीज पडून तिघांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. यामध्ये अनेकजण जखमी झाल्याचीही माहिती आहे.

27 मे रोजी सायंकाळी 6 वाजता भंडारा जिल्ह्यातील तालुका पवनी येथील खांबडी शेतशिवारात धान कापणी करिता आलेल्या हार्वेस्टर मशीनवरील कामगार आणि शेतकरी महिला पुरूष यांच्या अंगावर वीज पडून 2 इसम जखमी झाले असून 1 महिला व 1 पुरूष अशा दोघांचा मृत्यू झाला आहे. कांता रमेश जीभकाटे आणि विजय सिंह अशी दोघांची नावं आहेत. तर संजय नामदेव गाडेकर आणि महेश तेजा सिंग दोघेही जखमी झाले आहेत.

तर वर्ध्यात वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आर्वी तालुक्यातील कासारखेडा येथील आहे. दोन्ही शेतकरी आपल्या शेतात काम करण्यासाठी गेले असताना ही घटना घडली. रमेश गुणवंत अड्डे असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. आर्वी तालुक्याच्या कासारखेडा येथे वादळी पावसादरम्यान वीज पडून या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

Leave a Comment