Current MLA: माहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. नागपूर दक्षिण-पश्चिममधून देवेंद्र फडवणीस आणि कामठीमधून चंद्रशेखर बावनकुळे हे पहिल्या यादीत आहेत.
भाजपच्या पहिल्या यादीत 13 महिला उमेदवारांची नावं आहेत. यात मुंबईतील गोरेगावमधून माजी मंत्री विद्या ठाकूर यांचंही नाव आहे.
‘हे’ विद्यमान आमदार वेटिंगवर
भाजपनं जाहीर केलेल्या या पहिल्या यादीत अनेक विद्यमान आमदारांना वेटिंगवर ठेवलंय.
नागपूर मध्य मतदारसंघातील विद्यमान आमदार विकास कुंभारे यांची उमेदवारी अद्याप जाहीर झाली नाहीय, तसंच आर्वीच्या दादाराव केचेंचं नावही पहिल्या यादीत नाहीय.
गडचिरोलीचे डॉ. देवराव होळी, मूर्तीजापूरचे हरीश पिंपळे, वाशिमचे लखन मलिक, उमरखेडचे नामदेव ससाणे, नाशिक मध्य मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे, माळशिरसचे राम सातपुते, पुणे कॅन्टोन्मेंटचे सुनील कांबळे, गेरवाईचे लक्ष्मण पवार, खडकवासलाचे भीमराव तापकीर, पेणचे रवीशेठ पाटील या विद्यमान आमदारांचीही उमेदवारी भाजपनं अद्याप जाहीर केली नाहीय. त्यामुळे या आमदारांमध्ये धाकधूक वाढलीय.
मुंबईतील बोरिवलीचे सुनील राणे, वर्सोव्याच्या भारती लव्हेकर, घाटकोपर पूर्वचे पराग शाह आणि यांनाही वेटिंगवर ठेवण्यात आलंय.
तसंच, अकोटचे आमदार प्रकाश भारसाकले आणि उल्हासनगर पश्चिमचे कुमार उत्तमचंद आयलानी यांनाही अजून उमेदवारी जाहीर करण्यात आली नाहीय.
‘या’ विद्यमान आमदारांना तिकीट नाही
नागपुरातील कामठी मतदारसंघातून भाजपचे टेकचंद सावरकर हे विद्यमान आमदार आहेत. मात्र, इथून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकीट देण्यात आलं आहे. 2019 साली याच मतदारसंघातून बावनकुळेंचं तिकीट कापण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आलं, तसंच भाजपचं प्रदेशाध्यक्षपदही देण्यात आलं होतं.
औरंगाबादमधील फुलंब्री मतदारसंघातून भाजपनं अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी दिलीय. या मतदारसंघातील विद्यमान भाजप आमदार हरिभाऊ बागडे हे राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाल्यानंतर ही जागा रिक्त होती.
कल्याण पूर्व मतदारसंघातील भाजप आमदार गणपत गायकवाड हे गोळीबार प्रकरणी तुरुंगात आहेत. त्यांच्या जागी त्यांच्या पत्नीला म्हणजे सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिलीय.
पुण्यातील चिंचवडमधून विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांना तिकीट नाकारून, तिथे शंकर जगताप यांना तिकीट देण्यात आलीय. अश्विनी जगताप या पती लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत विजयी झाल्या होत्या.
पहिल्या यादीत मुंबईचे 14 उमेदवार जाहीर
पुण्यातील कसबा मतदारसंघातून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आला नाहीये. इथे भाजपच्या मुक्ता टिळक आमदार होत्या. त्यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली आणि त्यात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासनेंचा पराभव केला होता. या जागेवर भाजपनं पहिल्या यादीत तरी उमेदवार दिला नाहीये.
तसंच, पुण्यातीलच वडगाव शेरीमधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे सुनील टिंगरे विद्यमान आमदार आहेत. इथे भाजपचे जगदिश मुळीक इच्छुक आहेत. या जागेवरही भाजपनं पहिल्या यादीत कुणीच उमेदवार दिला नाहीय.
खडकवासल्यात भीमराव तापकीर हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. मात्र, पहिल्या यादीत त्यांचे नाव नाहीय.
मुंबईतील 14 उमेदवार भाजपनं जाहीर केले आहेत, मात्र वर्सोवा, घाटकोपर पूर्व आणि बोरिवली या दोन मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले नाहीत. वर्सोव्यातून भारती लव्हेकर आणि बोरिवलीतून सुनील राणे हे दोघेही भाजपचे विद्यमान आमदार आहेत. तर घाटकोपर पूर्वमधून पराग शाह हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत.
अशोक चव्हाणांच्या मुलीला भोकरमधून उमेदवारी
माजी मुख्यमंत्री आणि भाजपमध्ये जाऊन राज्यसभा खासदार बनलेल्या अशोक चव्हाण यांच्या मुलीला भाजपनं पहिल्या यादीत स्थान दिलंय. अशोक चव्हाणांची कन्या श्रीजया चव्हाण यांना नांदेडमधील भोकर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केलीय.
तर कालच शरद पवार यांची भेट घेतलेल्या गणेश नाईक यांना नवी मुंबईतील ऐरोलीतून उमेदवारी देण्यात आलीय.
काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करणाऱ्या विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नीला म्हणजे सुलभा गायकवाड यांना भाजपनं उमेदवारी दिलीय.
बच्चू कडूंविरोधात भाजपनं दिला उमेदवार
विदर्भातल्या 62 पैकी 23 जागांवर भाजपनं उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये विद्यमान आमदारांचं तिकीट कायम ठेवलेलं आहे. फक्त कामठीचे विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांचं तिकीट कापून त्याठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. 2019 ला बावनकुळेंचे तिकीट कापलं होतं.
अचलपूरमधून भाजपनं बच्चू कडूंविरोधात उमेदवार उतरवला आहे. प्रविण तायडे यांना उमेदवारी दिली आहे. प्रविण तायडे हे याआधी अमरावती जिल्हा परिषदेचे सदस्य होते.
गोंदियात विनोद अग्रवाल यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे. 2019 मध्ये त्यांनी तिकीट दिलं नाही म्हणून बंडखोरी केली होती. त्यांच्याऐवजी काँग्रेसमधून आलेल्या गोपालदास अग्रवाल यांना तिकीट दिलं होतं. यात विनोद अग्रवाल यांनी गोपालदास अग्रवाल यांचा पराभव केला होता.
भाजपनं त्यावेळी विनोद अग्रवाल यांचं निलंबन केलं होतं. त्यानंतर गेल्या महिन्यात गोपालदास अग्रवाल यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केली आणि भाजपनं विनोद अग्रवाल यांचं निलंबन मागे घेतलं. आता त्यांचं नाव भाजपच्या पहिल्या यादीत आलं आहे.
भाजपच्या पहिल्या यादीतले 99 उमेदवार :
1) नागपूर दक्षिण पश्चिम – देवेंद्र फडणवीस
2) कामठी – चंद्ररशेखर बावनकुळे
3) शहादा (आजजा) – राजेश पाडवी
4) नंदुरबार (अजजा) – विजयकुमार गावीत
5) धुळे शहर – अनुप अग्रवाल
6) शिंदखेडा – जयकुमार रावल
7) शिरपूर (अजजा) – काशिराम पावरा
8) रावेर – अमोल जावळे
9) भुसावळ (अजा) – संजय सावकारे
10) जळगांव शहर – सुरेश भोळे
11) चाळीसगाव – मंगेश चव्हाण
12) जामनेर – गिरीश महाजन
13) चिखली – श्वेता महाले
14) खामगांव – आकाश फुंडकर
15) जळगांव (जामोद) – डॉ. संजय कुटे
16) अकोला पूर्व – रणधीर सावरकर
17) धामणगांव रेल्वे – प्रताप अडसद
18) अचलपूर – प्रवीण तायडे
19) देवळी – राजेश बकाने
20) हिंगणघाट – समीर कुणावार
21) वर्धा – डॉ. पंकज भोयर
22) हिंगणा – समीर मेघे
23) नागपूर-दक्षिण – मोहन मते
24) नागपूर-पूर्व – कृष्णा खोपडे
25) तिरोडा – विजय रहांगडाले
26) गोंदिया – विनोद अग्रवाल
27) आमगाव (अजजा) – संजय पुराम
28) आरमोरी (अजजा) – कृष्णा गजबे
29) बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार
30) चिमूर – बंटी भांगडिया
31) वणी – संजीवरेड्डी बोडकुरवार
32) राळेगांव – अशोक उइके
33) यवतमाळ – मदन येरावार
34) किनवट – भीमराव केराम
35) भोकर – श्रीजया चव्हाण
36) नायगांव – राजेश पवार
37) मुखेड – तुषार राठोड
38) हिंगोली – तानाजी मुटकुळे
39) जिंतूर – मेघना बोर्डीकर
40) परतूर – बबनराव लोणीकर
41) बदनापूर (अजा) – नारायण कुचे
42) भोकरदन – संतोष दानवे
43) फुलंब्री – अनुराधा चव्हाण
44) औरंगाबाद पूर्व – अतुल सावे
45) गंगापूर – प्रशांत बंब
46) बागलान (अजजा) – दिलीप बोरसे
47) चंदवड – डॉ. राहुल अहेर
48) नाशिक पूर्व – अॅड. राहुल ढिकाले
49) नाशिक पश्चिम – सीमा हिरे
50) नालासोपारा – राजन नाईक
51) भिवंडी पश्चिम – महेश चौघुले
52) मुरबाड – किसन कथोरे
53) कल्याण पूर्व – सुलभा गायकवाड
54) डोंबिवली – रवींद्र चव्हाण
55) ठाणे – संजय केळकर
56) ऐरोली – गणेश नाईक
57) बेलापूर – मंदा म्हात्रे
58) दहिसर – मनिषा चौधरी
59) मुलुंड – मिहिर कोटेचा
60) कांदिवली पूर्व – अतुल भातखळकर
61) चारकोप – योगेश सागर
62) मलाड पश्चिम – विनोद शेलार
63) गोरेगाव – विद्या ठाकूर
64) अंधेरी पश्चिम – अमित साटम
65) विले पार्ले – पराग अळवणी
66) घाटकोपर पश्चिम – राम कदम
67) वांद्रे पश्चिम – अॅड. आशिष शेलार
68) सायन कोळीवाडा – आर. तमिल सेल्वन
69) वडाळा – कालिदास कोळंबकर
70) मलबार हिल – मंगलप्रभात लोढा
71) कोलाबा – अॅड. राहुल नार्वेकर
72) पनवेल – प्रशांत ठाकूर
73) उरण – महेश बाल्दी
74) दौंड – अॅड. राहुल कुल
75) चिंचवड – शंकर जगताप
76) भोसरी – महेश लांगडे
77) शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोळे
78) कोथरूड – चंद्रकांत पाटील
79) पर्वती – माधुरी मिसाळ
80) शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील
81) शेवगांव – मोनिका राजळे
82) राहुरी – शिवाजीराव कार्डिले
83) श्रीगोंदा – प्रतिभा पाचपुते
84) कर्जत जामखेड – राम शिंदे
85) केज (अजा) – नमिता मुंदडा
86) निलंगा – संभाजी पाटील निलंगेकर
87) औसा – अभिमन्यू पवार
88) तुळजापूर – राणा जगजीतसिंह पाटील
89) सोलापूर शहर उत्तर – विजयकुमार देशमुख
90) अक्कलकोट – सचिन कल्याणशेट्टी
91) सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख
92) माण – जयकुमार गोरे
93) कराड दक्षिण – अतुल भोसले
94) सातारा – शिवेंद्रराजे भोसले
95) कणकवली – नितेश राणे
96) कोल्हापूर दक्षिण – अमल महाडिक
97) इचलकरंजी – राहुल आवाडे
98) मिरज – सुरेश खाडे
99) सांगली – सुधीर गाडगीळ